अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली टॅक्स विभागाची आढावा बैठक

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज टॅक्स विभागासंदर्भात महत्त्वाची आढावा बैठक घेतली. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रॉपर्टी टॅक्स वसुली, थकबाकीदारांची यादी, ऑनलाइन टॅक्स भरणा प्रणालीची कार्यक्षमता आणि नवीन महसूल साधनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितले की, नागरी सुविधा सुधारण्यासाठी आणि महापालिकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी कर वसुली वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यांनी प्रभागनिहाय वसुलीचा आढावा घेतला आणि थकबाकीदारांकडून त्वरित वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास अधिक सोयीचे व्हावे यासाठी शनिवार दिनांक २ ऑगस्ट व रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील विविध प्रभागांमध्ये मालमत्ता कर वसुली शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना तात्काळ कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीनेही देयके स्वीकारली जातील.
तसेच, नागरिकांसाठी टॅक्स भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी डिजिटल सुविधा अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले. ऑनलाईन टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलतींचा प्रस्ताव देखील बैठकीत मांडण्यात आला.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, प्रॉपर्टी टॅक्स वसुली गतीमान करा. प्रभागनिहाय वसुलीचे टार्गेट निश्चित करून त्यानुसार नियमित आढावा घ्या व वसुलीला वेग द्या. थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करा. ज्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे, अशा थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून त्वरित वसुली करण्यासाठी विशेष पथक तयार करा. कर वसुली शिबिरांचा प्रभावी प्रचार करा. २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित कर वसुली शिबिरांबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी पोस्टर, सोशल मिडिया, वॉर्डस्तरावर सूचना फलक आदी माध्यमांचा प्रभावी वापर करा. डिजिटल पेमेंटस प्रोत्साहन द्या. नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरणा करावा यासाठी सुलभ सुविधा द्या आणि डिजिटल पेमेंट करणाऱ्या नागरिकांना सवलतींचा प्रस्ताव तयार करा. वसुली कर्मचाऱ्यांना उद्दिष्टांशी बांधील ठेवा. प्रत्येक वसुली अधिकारी/कर्मचाऱ्यांना ठराविक उद्दिष्ट (target) देण्यात यावे आणि त्याचे पालन न केल्यास उत्तरदायित्व निश्चित करावे. नागरिकांसोबत संवाद वाढवा. वसुली प्रक्रियेत नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. आवश्यकतेनुसार माहिती कक्ष, हेल्पडेस्कची स्थापना करा. वसुली मोहिमेचा साप्ताहिक आढावा घेण्यात यावा व प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की, शहराचा सर्वांगीण विकास, चोख नागरी सेवा आणि मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिकेला महसूल स्रोत बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून वेळेत मालमत्ता कर भरणे ही काळाची गरज आहे. महानगरपालिका आपल्या सेवा आणखी प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र त्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे. शनिवार दिनांक २ ऑगस्ट व रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या कर वसुली शिबिरांना उपस्थित राहून त्वरित कर भरावा व शहराच्या विकासात आपला मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले.
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी या कर वसुली शिबिरांचा लाभ घ्यावा व आपल्या मालमत्तेचा कर वेळेवर भरून शहर विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा. महानगरपालिकेने नागरिकांसाठी विशेष प्रोत्साहन म्हणून २ व ३ ऑगस्ट रोजी मालमत्ता कर भरलेल्या नागरिकांना एकूण कर रकमेवर १०% सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत शिबिरामध्ये किंवा ऑनलाईन टॅक्स भरतांना देखील लागू असेल.
या बैठकीस उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, कर अधीक्षक, वसुली लिपिक तसेच विविध प्रभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



