क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
अमरावती : नागरिकांनी शासनावर पूर्ण विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थकी लावण्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. चौथ्या फेडरेशन कपचा आज समारोप करण्यात आला. यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, दिलीप सानंदा, कबड्डी संघटनांचे तेजस्वी गेहलोत, विभोर जैन, जितेंद्र ठाकूर, विनय यादव, कुमार विजय आदी उपस्थित होते.
श्री. पवार यांनी राज्यात क्रीडा क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अमरावतीत क्रीडा क्षेत्राचा विकास होण्यासाठी वाव आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मागितलेल्या सुविधा पुरविण्यात येतील. आज देश आणि विदेशांमधील वातावरण पाहता खेळांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
अमरावती येथील कबड्डी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आलेले आहे. खेळाडूंची निवास, भोजन आणि खेळाच्या ठिकाणाची व्यवस्था उत्कृष्ट आहे. त्यामुळे या आयोजनाचे देशभर कौतुक होणार आहे. राज्यभरातील खेळाडूंनी अमरावतीवर दाखवलेला विश्वास या उत्कृष्ट आयोजनांमधून सार्थ ठरला आहे. येत्या काळातही क्रीडा क्षेत्राला आवश्यक असलेली मदत करण्यात येणार आहे. यावेळी क्रीडा स्पर्धेचे आयोजक यश खोडके यांनी प्रास्ताविक केले.



