Crime NewsLatest NewsNagpur
Nagpur Crime News : नागपूरमध्ये भररस्त्यात खून! तिघांनी चाकूने केला हल्ला, पिस्तूल दाखवत दहशत!
नागपूर: नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात भररस्त्यात उशिरा रात्री तिघांनी एका तरुणावर चाकूने सपासप वार करून जागीच ठार केलं. हत्येपूर्वी आरोपींनी खुलेआम फायरिंग केलं आणि नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही पिस्तूल उगारून धाक दाखवला. ही धक्कादायक घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ही घटना नागपूरच्या गजबजलेल्या झिंगाबाई टाकळी परिसरात घडली, जिथे वर्दळीच्या रस्त्यावरच तिघा आरोपींनी एका तरुणाला सपासप वार करत जागीच संपवलं. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
नागरिकांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पिस्तूल उगारून त्यांनाही धमकावलं. मात्र नागरिकांनी धैर्य गमावलं नाही. त्यांनी आरोपींना पकडून चोप दिला आणि लगेचच मानकापूर पोलिसांना माहिती देत तिघांना त्यांच्या हवाली केलं.
मानकापूर पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून, हत्या, फायरिंग आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात ही घटना खाजगी वादातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
नागरिकांमध्ये भीती, पोलिसांसमोर मोठं आव्हान
या घटनेमुळे नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वर्दळीच्या रस्त्यावर फायरिंग आणि खून झाल्यानं, पोलिस यंत्रणेवर वचक निर्माण करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.



