नागपुरातून चोरलेली 43 लाखांची फॉर्च्युनर गुजरातमध्ये जप्त – पोलिसांची मोठी कारवाई!

नागपूर :- नागपूर शहरात मोठी गुन्हेगारी घटना उघडकीस आली आहे. तब्बल 43 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर लिजेन्डर ए.टी. चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र, नागपूर पोलिसांच्या तडफदार तपासानंतर गुजरातमधून वाहन जप्त करण्यात आले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. कसे उलगडले हे संपूर्ण प्रकरण.
पाहुयात खास रिपोर्ट!
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता एका नामांकित कंपनीची महागडी गाडी चोरीला गेली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ही गाडी गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून खरेदी केली होती. मात्र, गाडीच्या मालकाकडून फक्त एकच चाबी त्यांना देण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने CCTV फुटेज तपासले, त्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती गाडीच्या जवळ येत असलेली दिसली. काही क्षणातच तो गाडी सुरु करून तिथून पसार झाला. फिर्यादीच्या संशयावरून, प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, ही गाडी पूर्वीच्या मालकानेच परस्पर परत नेली असावी. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांचे एक विशेष पथक गुजरातच्या सुरत जिल्ह्यात रवाना झाले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करत आरोपी पारस शेखलीया याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली GJ-05-RY-5755 क्रमांकाची फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आली. गाडीची अंदाजे किंमत 43 लाख रुपये असून, आरोपीला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही यशस्वी कारवाई मा. निकेतन कदम, पोलीस उपआयुक्त, विशाल क्षीरसागर, सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा पर्दाफाश केला.
नागपूर पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या काही दिवसांतच मोठी कामगिरी बजावली आहे. चोरीस गेलेली गाडी हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात आल्याने वाहनचोरीस प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलल्याचे दिसते. पुढील तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नागपूरसह राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा जलदगती कारवाईंची नितांत गरज आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज



