चिखलीत पतीचा क्रूर चेहरा! कुऱ्हाडीने वार करून पत्नीची निर्घृण हत्या

कुटुंबातील सर्वजण झोपेत असताना मध्यरात्री थरारक घटना; सकाळी ७ वाजता प्रकार उघडकीस, परिसरात खळबळ
गोंदिया | प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील चिखली येथे पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा उलगडा मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

रामकला जागेश्वर शिवणकर (वय ४१) असे मृत महिलेचे नाव असून, जागेश्वर आसाराम शिवणकर (वय ४६) असे आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २४ नोव्हेंबरच्या रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना ही रक्तरंजित घटना घडली. याचदरम्यान आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रामकला यांचा मृत्यू झाला. रात्री घडलेल्या या घटनेची माहिती सकाळी सात वाजताच्या सुमारास समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करून आवश्यक तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून ही घटना घडली की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. एका महिलेचा अशा प्रकारे जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत असून, तपासातून हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
सिटी न्यूजसाठी सुधीर शिवणकर, गोंदिया.



