citynewsWardha

कौंडण्यपूरच्या विकास आराखड्यातील सर्व कामे प्रत्यक्षात आणणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अंबा-रुख्मिणी महोत्सवात पालकमंत्र्यांची ग्वाही; हिवाळी अधिवेशनात विकासकामांसंदर्भात बैठक घेणार, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी रुख्मिणी मातेकडे साकडे

अमरावती | प्रतिनिधी

माता रुख्मिणीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या पवित्र तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे प्रत्यक्षात आणली जातील, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच नागपूर येथे होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान या विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानात आयोजित अंबा-रुख्मिणी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण तायडे, माजी खासदार नवनीत राणा, श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष नामदेवराव अंबाडकर यांच्यासह संत-महंत, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, श्रीक्षेत्र कौंडण्यपूर हे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. या क्षेत्राचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील प्रस्तावित कामांना गती देऊन ती पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून, विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल. यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी रुख्मिणी मातेकडे साकडे

राज्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी माता रुख्मिणीच्या चरणी साकडे घातले. राज्यातील ३१० तालुके दुष्काळसदृश म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे नमूद करत त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. अंबा-रुख्मिणी महोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाने आपल्या गावात आणि परिसरात सुरू असलेल्या जलसंवर्धनाच्या कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

वर्धा नदीच्या पावित्र्याचे जतन करण्याचे आवाहन

कौंडण्यपूर येथील मंदिर संस्थानसमोरील वर्धा नदीला अर्पण करण्यात आलेली २२१ मीटर लांबीची वैशिष्ट्यपूर्ण साडी ही नदीप्रती नागरिकांच्या कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. वर्धा नदी ही कौंडण्यपूरसह वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची जीवनदायिनी आहे. त्यामुळे या नदीचे पावित्र्य टिकवून ठेवणे, नदीचे प्रदूषण रोखणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधिवत पूजन करून नदीला २२१ मीटरची साडी अर्पण

या महोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम श्री विठ्ठल-रुख्मिणी मातेची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते वर्धा नदीचे पूजन करण्यात आले. यावेळी नदीच्या विस्तीर्ण पात्रात २२१ मीटर लांबीची वैशिष्ट्यपूर्ण साडी अर्पण करण्यात आली. या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला लोकप्रतिनिधी, संत-महंत, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौंडण्यपूरच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे जतन करण्यासोबतच तीर्थक्षेत्राचा नियोजनबद्ध विकास, नदी संवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर या विषयांवर या महोत्सवाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button