मनपाचा थकबाकीदारांना दणका; शाळेसह दालमिलची मालमत्ता सील!

दस्तूरनगर झोनची धडक कारवाई; पोस्टमन कॉलनीतील ईगल कॉमेंट स्कूल आणि एमआयडीसीतील ओम नमः शिवाय दालमिलवर कारवाई
अमरावती : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, कराचा भरणा न करणाऱ्या दोन मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी पोस्टमन कॉलनीतील ईगल कॉमेंट स्कूल आणि एमआयडीसी औद्योगिक परिसरातील ओम नमः शिवाय दालमिल या दोन मालमत्ता सील केल्या. या दोन्ही मालमत्तांकडे एकूण ५ लाख २१ हजार ५५ रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता.

महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक C8 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोस्टमन कॉलनी येथील मालमत्ता क्रमांक २७८ असलेल्या ईगल कॉमेंट स्कूलकडे ३ लाख ३ हजार ३५८ रुपयांची करथकबाकी होती. वारंवार सूचना देऊनही थकीत कराचा भरणा न झाल्याने मनपा प्रशासनाने जप्तीनाम्यानुसार शाळेची मालमत्ता सील केली.
त्याचप्रमाणे एमआयडीसी औद्योगिक परिसरातील मालमत्ता क्रमांक २००४ असलेल्या ओम नमः शिवाय दालमिलकडे २ लाख १७ हजार ६९७ रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. संबंधित मालमत्ताधारकाकडून कराचा भरणा न झाल्याने दालमिलवरही सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
या दोन्ही मालमत्तांची एकत्रित थकबाकी ५ लाख २१ हजार ५५ रुपये असून, मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाने ही धडक मोहीम राबविली. झोन क्रमांक ३ चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी प्रवीण ठाकरे, दीपक सरसे, आकाश चौधरी आणि आनंद बुंदिले उपस्थित होते.
दरम्यान, शहरातील थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा वेग वाढविला आहे. मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत कराचा वेळेत भरणा करून जप्ती आणि सील करण्यासारख्या कारवाईला सामोरे जाणे टाळावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



