इंडिया आघाडी, मविआला अचानक लोकशाहीचा पुळका; विरोधक ढोंगी आणि दुटप्पी – एकनाथ शिंदे

नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप; विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून लोकशाहीचा अपमान केल्याची टीका
नागपूर, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांवर घणाघाती टीका केली. विरोधकांना अचानक लोकशाहीचा पुळका आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिंदे म्हणाले की, “इंडिया आघाडी आणि मविआला अचानक लोकशाहीचा पुळका आला आहे. विरोधकांनी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा डाव आखला आहे. या विरोधकांचा बुरखा फाडला पाहिजे.”
“1975 मध्ये आणीबाणी होती, आता विरोधक मोकाट सुटले”
विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी 1975 च्या आणीबाणीचा संदर्भ दिला. त्यावेळी प्रसारमाध्यमांवर निर्बंध होते, मात्र आज विरोधक सर्व प्रकारे मोकळेपणाने बोलत आणि आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले.
“1975 मध्ये आणीबाणी होती. त्यावेळी माध्यमांवर बंदी होती. आता मात्र सगळे मोकाट सुटले आहेत. विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून लोकशाहीचा अपमान केला,” अशी टीका शिंदे यांनी केली.
“मोदी जातील म्हणता, तुमच्या बापाचं राज्य आहे का?”
विरोधकांवर टीकेची झोड उठवत शिंदे यांनी त्यांना ढोंगी आणि दुटप्पी असे संबोधले. जनतेने विरोधकांना नाकारले असून, त्यांनी जनतेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
“मोदी जातील, असे म्हणता; तुमच्या बापाचं राज्य आहे का? जनतेत जा आणि निवडून या. तुम्ही रिजेक्ट माल आहात. लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
2014 पूर्वीच्या कारभारावरही निशाणा
शिंदे यांनी 2014 पूर्वीच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांवरही गंभीर आरोप करत त्या काळात विविध घोटाळ्यांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरलेले असायचे, असा दावा केला.
“2014 च्या आधी वृत्तपत्रांमध्ये रकानेच्या रकाने घोटाळ्यांच्या बातम्या यायच्या. त्या काळातील सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे सर्वच प्रकार केले,” असा आरोप त्यांनी केला.
पाकिस्तानबाबतच्या तत्कालीन धोरणावरही त्यांनी टीका केली. “त्यावेळी पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिले जायचे,” असा टोला त्यांनी लगावला.
“मोदी हटणार नाहीत, अराजकता आणि भ्रष्टाचार हटेल”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदी हटणार नाहीत; मात्र देशातील अराजकता आणि भ्रष्टाचार हटेल.
“मोदी हटणार नाहीत, मात्र अराजकता हटेल आणि भ्रष्टाचारही हटेल. जनता आता तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला. 2014 पासून देशात एक तरी मोठा बॉम्बस्फोट झाला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विरोधकांवर जोरदार राजकीय हल्लाबोल
नरेंद्र मोदी यांना जाणूनबुजून बदनाम केले जात असून, विरोधकांचा खरा चेहरा जनतेसमोर आणला पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले. “चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. विरोधकांनी जनतेत जाऊन निवडून येऊन दाखवावे,” असे आव्हान त्यांनी दिले.
एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



