citynewsGondiaLatest NewsMaharashtra

गोंगलेत रेशन दुकानदारावर धान्य कपातीचा आरोप; शेकडो ग्रामस्थांची तहसील कार्यालयात तक्रार

‘तहसीललाही मॅनेज करतो’ म्हणत दमदाटी केल्याचा नागरिकांचा दावा; पुरवठा विभागाच्या पथकाकडून गावात चौकशी

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील गोंगले येथे स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रेशनमध्ये दोन ते तीन किलो धान्याची कपात केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रेशन दुकानदार राजेश शालिकराम पटले यांच्याविरोधात शेकडो ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पुरवठा विभागाने गावात जाऊन चौकशी केली आहे.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार, स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या तांदूळ आणि गव्हाच्या प्रमाणात दोन ते तीन किलोची कपात केली जात होती. याबाबत दुकानदाराला जाब विचारला असता, ग्राहकांशी उद्धट वर्तन करून दमदाटी करण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

इतकेच नव्हे, तर ‘तहसीललाही मॅनेज करतो, कुठेही तक्रार करा, माझे काहीही होणार नाही,’ असे आव्हान दुकानदाराने दिल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात धाव घेत लेखी तक्रार सादर केली.

तक्रारीनंतर ३० ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता पुरवठा विभागाचे पथक गोंगले येथे दाखल झाले. पुरवठा अधिकारी लीना लिमजे, निरीक्षक सागर गवळी आणि कनिष्ठ लिपिक प्राजक्ता लेदारे यांनी गावात जाऊन संबंधित प्रकरणाची चौकशी केली.

दरम्यान, चौकशी झाल्यानंतर आता संबंधित रेशन दुकानदारावर नेमकी काय कारवाई होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. धान्य कपातीच्या आरोपांची निष्पक्ष तपासणी होण्यासोबतच प्रशासनाला मॅनेज केल्याच्या कथित वक्तव्याचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गरीब लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्यात कपात होत असल्याच्या आरोपामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे चौकशी केवळ कागदोपत्री न राहता दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

सिटी न्यूजसाठी सुधीर शिवणकर, गोंदिया.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button