अचलपूरमध्ये रस्त्याच्या कामावरून व्यापाऱ्यांचे आंदोलन; संपूर्ण बाजारपेठ बंद

आमदार बच्चू कडू यांची आंदोलनस्थळी भेट; दिवाळीपूर्वी रस्ता तयार करण्याचे अभय माथने यांचे आश्वासन
अचलपूर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रस्त्याच्या कामावरून व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील वाद चिघळला आहे. अचलपूर पोलीस ठाण्यापासून देवळी मार्गापर्यंत सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे उडणारी धूळ आणि धूर दुकानांमध्ये जात असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. याच्या निषेधार्थ आज सकाळपासून देवळी मार्गावरील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत रस्त्यावर धरणे आंदोलन सुरू केले.
दोन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला दुकाने बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, समस्येवर तोडगा न निघाल्याने आज व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनाचे पाऊल उचलले. या आंदोलनामुळे परिसरातील व्यापारी व्यवहार ठप्प झाले.
आंदोलनाची माहिती मिळताच आमदार बच्चू कडू यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नगरपालिकेला दिल्या. यावेळी नगराध्यक्ष रूपाली माथने आणि स्वीकृत नगरसेवक अभय माथने हे देखील घटनास्थळी दाखल झाले.
नगराध्यक्षांनी नगरपालिकेचे अभियंता मनीष चोमवाल यांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर अभियंता चोमवाल हे मुख्याधिकाऱ्यांसह तेथे पोहोचले. रस्त्याच्या कामाबाबत चर्चा करताना अभय माथने यांनी सांगितले की, संबंधित रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण करून व्यापाऱ्यांसाठी चांगला रस्ता तयार करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, नगरपालिका प्रशासनाकडून काम होण्याची वाट न पाहता, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी स्वतःच्या खर्चाने दिवाळीपूर्वी हा रस्ता तयार करून देणार असल्याचे अभय माथने यांनी स्पष्टपणे सांगितले.
या आश्वासनानंतर उपस्थित व्यापाऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कधी होते, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूज, अचलपूर.



