नागपुरात विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून तरुण प्लंबरचा मृत्यू

लोखंडी शिडीचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याने दुर्घटना; राजीव गांधी नगर परिसरातील घटना
नागपूर : उत्तर नागपुरातील राजीव गांधी नगर परिसरात विजेच्या ट्रान्सफॉर्मरजवळ काम करताना भीषण दुर्घटना घडली. लोखंडी शिडीचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून २० ते २२ वर्षीय तरुण प्लंबरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काम करताना शिडीचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण प्लंबरचे काम करत होता. राजीव गांधी नगर परिसरात विजेच्या ट्रान्सफॉर्मरजवळ काम सुरू असताना त्याच्या हातातील लोखंडी शिडीचा ट्रान्सफॉर्मरशी संपर्क आला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुण फुकट नगर परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
यशोधरा नगर पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस चांद शेख हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला.
अकस्मात मृत्यूची नोंद
याप्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अपघात नेमका कसा घडला याचा पुढील तपास सुरू आहे.
सिटी न्यूज | नागपूर



