नागपुरात शेजाऱ्यांमधील वादातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

गच्चीवर जेवताना सुरू झाला वाद; आरोपीची आई आणि बहिणीकडूनही मारहाण, मुख्य आरोपी फरार
नागपूर : शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजाऱ्यांमधील किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याची घटना समोर आली आहे. गच्चीवर जेवण करताना झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
गच्चीवर जेवताना वादाची ठिणगी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र घराच्या गच्चीवर जेवण करत होते. त्याचवेळी शेजारी राहणारा आरोपी नेहाल उके आणि त्याचे मित्रही त्यांच्या गच्चीवर जेवत होते. यादरम्यान नेहाल याने फिर्यादीला चिडवण्यासाठी काहीतरी विधान केल्याचा आरोप आहे.
याबाबत फिर्यादीने फोन करून नेहालला जाब विचारला. त्यानंतर दोन्ही बाजूचे लोक घराखाली आले आणि वाद वाढला.
आई आणि बहिणीकडून मारहाण; चाकूने हल्ला
तक्रारीनुसार, घरासमोर झालेल्या वादादरम्यान आरोपी नेहाल याची आई आणि बहीण यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. याच गोंधळात मुख्य आरोपी नेहाल उके याने फिर्यादीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.
आई आणि बहिणीला ताब्यात; मुख्य आरोपीचा शोध सुरू
पीडिताच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या आई आणि बहिणीला ताब्यात घेतले असून, फरार असलेल्या मुख्य आरोपी नेहाल उकेचा शोध सुरू आहे.
बाईट : जयवंत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इमामवाडा पोलीस ठाणे
सिटी न्यूज | नागपूर



