नागपुरात वकिलाला शिवीगाळ अन् मारहाण; जेल कर्मचारी आणि साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल

मध्यवर्ती कारागृह परिसरातील वादानंतर रवी नगर चौकात पाठलाग करून मारहाण केल्याचा आरोप
नागपूर : नागपूर शहरात वकिलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात २८ ऑक्टोबर रोजी जेल कर्मचारी अमोल यवतकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. गौरव दिगंबर वंजारी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.
वकालतनामा सादर करण्यावरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता अॅड. गौरव वंजारी हे आपल्या पक्षकाराचा वकालतनामा सादर करण्यासाठी मध्यवर्ती कारागृह परिसरात गेले होते. त्यावेळी जेल कर्मचारी अमोल यवतकर हा आपल्या मित्रांसह दुचाकीवरून तेथे आला.
वकालतनामा सादर करण्याच्या वेळेवरून अमोल यवतकर याने वंजारी आणि त्यांच्यासोबत असलेले श्रीकांत निमजे यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वकिलांनी वकालतनामा पेटीत टाकून तेथून निघण्याचा प्रयत्न केला.
रवी नगर चौकात पाठलाग करून मारहाण
तक्रारीनुसार, आरोपींनी वकिलांचा पाठलाग केला आणि रवी नगर चौकात त्यांना पुन्हा गाठले. यावेळी अॅड. गौरव वंजारी यांना पुन्हा शिवीगाळ करण्यात आली. तसेच हातातील कड्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
धंतोली पोलिसांकडून तपास सुरू
पीडित वकिलाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी जेल कर्मचारी अमोल यवतकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून संबंधित बाबींची चौकशी करण्यात येत आहे.
टिकर : नागपुरात वकिलाला शिवीगाळ अन् मारहाण; जेल कर्मचारी आणि साथीदारावर गुन्हा दाखल
बाईट : साईनाथ रामोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धंतोली पोलीस ठाणे
सिटी न्यूज | नागपूर



