amravatiAmravati GraminCrime News

घरगुती LPG सिलेंडरमधून ऑटोमध्ये गॅस रिफिलिंग; पाच जण ताब्यात

नांदगाव खंडेश्वरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 12 लाख 31 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमरावती ग्रामीणमधून घरगुती वापराच्या LPG सिलेंडरचा बेकायदेशीर पद्धतीने व्यावसायिक वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नांदगाव खंडेश्वर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत घरगुती LPG सिलेंडरमधून थेट ऑटो रिक्षांमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 24 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बहिरम बाबा टेकडीजवळ, चांदूर रेल्वे रोड परिसरात ऑटो रिक्षांमध्ये घरगुती LPG सिलेंडरमधून गॅस भरला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शेख जमीर शेख अल्लाउद्दीन हा इलेक्ट्रिक मोटारच्या सहाय्याने ऑटोमध्ये LPG गॅस भरताना आढळून आला. तर इतर चार संशयित ऑटो रिक्षा आणि घरगुती LPG सिलेंडरसह रिफिलिंगसाठी उपस्थित असल्याचे पोलिसांना आढळून आले. या कारवाईत चार ऑटो रिक्षा, पाच घरगुती LPG सिलेंडर, दोन इलेक्ट्रिक गॅस रिफिलिंग मशीन, रिफिलिंग नळ्या, नोझल, वजन काटा आणि इलेक्ट्रिक एक्सटेंशन बॉक्स असा एकूण 12 लाख 31 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस करत आहेत.

घरगुती वापरासाठी असलेल्या LPG सिलेंडरचा अशा पद्धतीने व्यावसायिक आणि बेकायदेशीर वापर केल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button