
कन्या शाळा, एसडीओ क्वार्टरसह वर्धा रोड परिसरात हालचालींची चर्चा; वनविभागाकडून गस्त वाढवली
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात पहाटेच्या सुमारास बिबट्यासदृश वन्यप्राणी दिसल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कन्या शाळा आणि एसडीओ क्वार्टर परिसरात या वन्यप्राण्याचे दर्शन झाल्याची चर्चा असून, वाघ साईनगर, शिलाराम मंगल कार्यालय परिसर आणि वर्धा रोड भागातही वन्यप्राण्याच्या हालचाली असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, सकाळच्या वेळी या परिसरातून मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, विद्यार्थी आणि इतर नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्याच्या हालचालींची माहिती मिळताच वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून, वन्यप्राणी नेमका कोणता आहे आणि त्याचा वावर कुठे आहे, याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नागरिकांनी विशेष खबरदारी घेत एकट्याने बाहेर पडणे टाळावे आणि रात्री किंवा पहाटेच्या वेळी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आर्वी शहरात नेमका कोणता वन्यप्राणी फिरत आहे, याबाबत वनविभागाच्या अधिकृत तपासणीनंतरच स्पष्टता होणार आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे गरजेचे आहे. वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याचा पाठलाग करणे किंवा गर्दी करून त्याला घेरण्याचा प्रयत्न करू नये. वनविभागाच्या सूचनांचे पालन करत सुरक्षितता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



