
तुळशीबाग मार्गे कोराडीच्या दिशेने मिरवणूक; डीजेला फाटा देत पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप

दहा दिवसांच्या भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस उजाडला आहे… नागपूर शहरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून, नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूकही उत्साहात पुढे सरकत आहे. तुळशीबाग मार्गे ही मिरवणूक आता कोराडीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. यंदा प्रशासनाच्या निर्देशानुसार डीजेला फाटा देत पारंपरिक पद्धतीने बँडच्या तालावर गणरायाला निरोप दिला जात आहे. दहा दिवस गणरायाच्या आगमनाने भक्तिमय झालेल्या नागपूर शहरात आता निरोपाच्या क्षणी भाविकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात भावनांचा कल्लोळ पाहायला मिळत आहे. साधेपणा, शिस्त आणि पारंपरिकतेचा संदेश देत बँडच्या तालावर ही मिरवणूक पुढे सरकत आहे. विशेष म्हणजे, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणरायाने भरपूर पाऊस पाडावा आणि बळीराजासह संपूर्ण नागपूरकरांवर सुख-समृद्धीचा आशीर्वाद ठेवावा, अशी मनोभावे प्रार्थना भाविकांकडून केली जात आहे.

गणरायाला निरोप देताना प्रत्येक भाविकाच्या मनात एकच भावना… गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! भक्ती, श्रद्धा आणि भावनांनी भारलेल्या या वातावरणात नागपूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला आहे. आता पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जाणार आहे.



