BreakingNewsMaharashtracitynewsCrime NewsNagpurCrime

जुन्या वादातून दोन गट आमनेसामने; 18 वर्षीय तरुणाची हत्या

जरीपटका येथील लुंबिनी नगर परिसरातील घटना; तीन संशयित ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू

नागपूर : शहरातील जरीपटका परिसरात जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्यानंतर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लुंबिनी नगर परिसरात, जिंजर मॉलजवळ ही घटना घडली. मृत तरुणाची ओळख आबिद उर्फ अबू अब्दुल रज्जाक शेख अशी झाली आहे. या घटनेत त्याचा एक साथीदारही जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मृतकाच्या भावाचा काही जुन्या कारणावरून एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. या वादानंतर दोन्ही बाजूंनी काही तरुणांना एकत्र केल्याची माहिती समोर आली आहे. एका गटातील तरुणांकडे लाकाठ्या आणि दांडके, तर दुसऱ्या गटातील काही तरुणांकडे चाकू आणि तलवारीसारखी धारदार हत्यारे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर अचानक परिस्थिती चिघळली आणि एकमेकांवर हल्ला करण्यात आला. हल्ला सुरू होताच घटनास्थळावर उपस्थित असलेले काही तरुण तेथून पळून गेले. मात्र, या हल्ल्यात आबिद उर्फ अबू आणि त्याचा एक साथीदार गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमी झालेल्या आबिदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर जरीपटका परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. हल्ल्यामागील नेमके कारण, वापरण्यात आलेली हत्यारे आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहे.

दरम्यान, या हत्याकांडातील तीन संशयित आरोपींना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समदुरे मेजर यांच्या डीबी पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास केला जात आहे.

पोलिसांकडून हत्येचे नेमके कारण, दोन्ही गटांमध्ये किती जण सहभागी होते, हल्ल्यात कोणकोणती हत्यारे वापरण्यात आली आणि या घटनेमागील पूर्ववैमनस्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती, याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली असून, तपासाअंती हत्याकांडाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button