भरधाव वाहनाच्या धडकेत बँड पथकातील दोघांचा मृत्यू

नांदगाव पेठ परिसरातील नवीन उड्डाणपुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिंग रोडजवळील नवीन उड्डाणपुलाजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत बँड पथकातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गणपती महोत्सवाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना हा अपघात झाला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष राधेलाल शाहू (वय ४०) हे छत्रसाल नगर, अमरावती येथील रहिवासी असून बँड पथक चालविण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या बँड पथकात सुमारे २० जण रोजंदारी पद्धतीने काम करतात. नांदगाव पेठ येथे गणपती महोत्सवानिमित्त बँड वाजवण्यासाठी हे पथक गेले होते.
दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता कार्यक्रमाचे काम पूर्ण झाल्यानंतर पथकातील सदस्य घरी परतत होते. त्यावेळी विकी शंकर अंभोरे (वय २५) आणि अभय विलास साबळे (वय २०), दोघेही रा. अचलपूर, हे देखील परतीच्या मार्गावर होते.
दरम्यान, रिंग रोडजवळील नवीन उड्डाणपूल, आंबा पार्क परिसरात आरोपी वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून अपघात केला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात CR No. 396/2026 अन्वये कलम 281, 125(a), 106(1) BNS तसेच कलम 184 मोटार वाहन कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी वनराज भाई रामसिंग भाई मेमिया (वय ४०), रा. चौगुला, सुरेंद्रनगर, गुजरात याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.४४ वाजता नोंदवण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक अनिता इंगळे यांनी गुन्हा दाखल केला असून, नांदगाव पेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



