रामटेकच्या मार्बती उत्सवातून चिमुकल्या श्रीनिकासाठी मदतीची हाक

SMA Type 2 आजाराने ग्रस्त दोन वर्षे दहा महिन्यांच्या श्रीनिकाच्या उपचारासाठी १० कोटींची गरज; रामटेककरांसह समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन
रामटेक : रामटेकच्या ऐतिहासिक मार्बती उत्सवाला यंदा मानवतेची अनोखी जोड मिळाली. पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाने साजऱ्या झालेल्या मार्बती उत्सवाच्या माध्यमातून अवघ्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या श्रीनिका रोहित माकडे या चिमुकलीसाठी मदतीची हाक देण्यात आली. श्रीनिकाला दुर्मिळ SMA Type 2 आजाराने ग्रासले असून, तिच्या उपचारासाठी तब्बल १० कोटी रुपयांची गरज आहे. तिचे आयुष्य वाचवण्यासाठी रामटेककरांसह सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजक आणि दानशूर नागरिकांनी पुढे येऊन आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
रामटेक शहरातील रामतलाई धार्मिक मैदान, पेपशेश्वर मंदिर आणि शनिवारी वॉर्ड परिसरातून यंदाही पारंपरिक मार्बती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मार्बतीची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वातावरण आणि हजारो नागरिकांच्या सहभागामुळे संपूर्ण रामटेक शहर उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाले.
मात्र, यंदाच्या मार्बती उत्सवाचे विशेष आकर्षण केवळ धार्मिक आणि पारंपरिक उत्साह नव्हते, तर या उत्सवातून देण्यात आलेला मानवतेचा संदेश ठरला. अवघ्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या श्रीनिका रोहित माकडे हिला SMA Type 2 या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. तिच्या उपचारासाठी तब्बल १० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याने हे आव्हान तिच्या कुटुंबासाठी अत्यंत मोठे आहे.
श्रीनिकाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली मोठी रक्कम उभी करण्यासाठी आता समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. रामटेककरांसह सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजक तसेच दानशूर व्यक्तींनी आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.
‘छोटीशी मदतही श्रीनिकाच्या उपचारासाठी मोठा आधार ठरू शकते’, असा संदेश यावेळी देण्यात आला. पारंपरिक श्रद्धा आणि उत्सवाच्या आनंदासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श रामटेकच्या मार्बती उत्सवातून पाहायला मिळाला.
मार्बतीच्या मिरवणुकीतून ‘एकीच्या बळातून चिमुकली श्रीनिकाचे आयुष्य वाचवूया’ हा मानवतेचा संदेश देण्यात आला. उत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलेले हे आवाहन आता अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
श्रीनिकाच्या उपचारासाठी १० कोटी रुपयांचे आव्हान मोठे असले, तरी समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला, तर हे आव्हान पेलणे शक्य होऊ शकते. रामटेकच्या मार्बती उत्सवाने यंदा परंपरेसोबतच माणुसकी आणि सामाजिक एकतेचा संदेश देत एका चिमुकलीच्या जीवनासाठी आशेचा किरण निर्माण केला.



