citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरातील मनपा शाळांचा दर्जा उंचावणार!

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची पीएमश्री लालबहादूर शास्त्री विद्यालयाला भेट; क्रीडा, आत्मरक्षा आणि आधुनिक शिक्षणावर भर देण्याच्या सूचना

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नागपुरातील हनुमाननगर येथील पीएमश्री लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. बुधवारी ९ सप्टेंबर रोजी झालेल्या या भेटीदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी शाळेतील शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, आधुनिकीकरण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यासावर नव्हे, तर शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रावरही विशेष भर देण्याच्या सूचना केल्या.

प्रत्येक शनिवारी मनपाच्या सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायत नियमितपणे घेण्यात यावी, अशी सूचना शिक्षणमंत्री भुसे यांनी केली. शारीरिक शिक्षणासाठी प्रत्यक्ष खेळाडू तसेच माजी सैनिकांना प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिर मनपा शाळांमध्येही राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, महापौर निता ठाकरे यांनी मनपा शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती शिक्षणमंत्र्यांना दिली. दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असलेल्या मनपा शाळा सीबीएसईच्या धर्तीवर विकसित करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आवश्यक ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता मिळावी, अशी मागणीही महापौरांनी केली.

या मागण्यांसंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावा. त्यावर सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

हनुमाननगर येथील पीएमश्री लालबहादूर शास्त्री विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. या शाळेतील गुणवत्तापूर्ण सुविधा आणि उपक्रमांचा आदर्श घेऊन अशाच प्रकारचे उपक्रम इतर मनपा शाळांमध्येही राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मनपा आणि आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

कमी पटसंख्या असलेल्या आणि बंद होण्याच्या स्थितीत असलेल्या मनपा शाळांचा दर्जा उंचावणे गरजेचे असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. समाजातील सर्व स्तरांतील पालकांचा मनपा शाळांकडे ओढा निर्माण होईल, अशा पद्धतीने या शाळांचा विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महापौर निता ठाकरे यांनी मनपा शाळांमधील शारीरिक शिक्षण शिक्षकांची कमतरता, शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी आणि विद्यार्थ्यांना गणवेशासोबत देण्यात येणारे बूट अद्याप प्राप्त न झाल्याची बाब शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या समस्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याची विनंतीही त्यांनी केली.

शिक्षणमंत्री भुसे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आधुनिक सुविधा, क्रीडा प्रशिक्षण, आत्मरक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

मनपा शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या सहकार्याने मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा आणखी उंचावून त्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि आकर्षक शिक्षणाची केंद्रे बनविण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती महापौर निता ठाकरे यांनी दिली.

या भेटीवेळी उपमहापौर लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लड्ढा, शिवसेनेचे गटनेते गणेश चार्लेवार, उपसभापती भारती बुंदे, नगरसेविका मंगला मस्के, मानसी शिमले, नगरसेवक चंद्रकांत खांगर, नगरसेविका वैशाली उदापुरकर, सय्यद मुस्कान, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी अमित भदाणे, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, मुख्याध्यापिका सीमा जयसिंघानी यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button