
मंगेश ससाणेंसह चार सहकाऱ्यांना ताब्यात; विनापरवाना उपोषण केल्याने कारवाई
मुंबई : ओबीसी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही उपोषण सुरू ठेवण्यावर ठाम राहिलेल्या आंदोलकांवर अखेर पोलिसांनी कारवाई केली. ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्यासह त्यांच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, वाहतुकीला होणारा अडथळा आणि विनापरवाना लाक्षणिक उपोषणाच्या कारणावरून पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती.
पोलिसांनी कालच आंदोलनाला परवानगी नाकारत आंदोलकांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र, मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका कायम ठेवली. त्यानंतर पोलिसांनी ससाणे यांच्यासह चार सहकाऱ्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान आंदोलकांकडून फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मंगेश ससाणे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. मनोज जरांगे यांचे आंदोलन सरकारनेच उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सरकार ओबीसी समाजाला दुय्यम वागणूक देत असल्याचा दावाही ससाणे यांनी केला.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर ओबीसी आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या कारवाईनंतर आंदोलनाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



