citynewsFestival NewsLatest NewsMaharashtraMumbai

५० किल्ल्यांच्या मातीतून साकारला गणराय! सांताक्रूझच्या मंडळाचा अनोखा उपक्रम

शिवरायांच्या गडकिल्ल्यांना अनोखी मानवंदना; सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्राचा इतिहास आणि गणेशभक्तीचा संगम

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचा गौरवशाली वारसा आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी सांताक्रूझच्या स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अनोखा उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रातील तब्बल ५० पावन किल्ल्यांची माती एकत्र करून या मातीच्या मिश्रणातून गणरायाची मूर्ती साकारण्यात आली आहे.

मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारण्यात आलेली ही मूर्ती केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक न राहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना दिलेली अनोखी मानवंदना ठरत आहे. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांची माती आणि गणरायाची भक्ती यांचा अनोखा संगम या उपक्रमातून साधण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला ओळख व्हावी आणि ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने मंडळाने हा विशेष उपक्रम राबवला. ५० किल्ल्यांची माती एका गणेशमूर्तीत एकत्र आणत मंडळाने महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि संस्कृतीला अनोखी आदरांजली वाहिली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भायखळा ते सांताक्रूझ असा पायी प्रवास करत मुंबईतील नामांकित गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेटी दिल्या. यामध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, लालबागचा राजा, तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडळाचा समावेश होता.

या नामांकित गणेश मंडळांनीही ५० किल्ल्यांच्या मातीतून साकारलेल्या या विशेष गणरायाच्या उपक्रमाची दखल घेत स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कला, क्रीडा तसेच विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक भक्तीसोबतच इतिहास, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा संदेश देणारा हा उपक्रम मुंबईत विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

५० किल्ल्यांची माती… एका गणरायाची मूर्ती… आणि त्यातून महाराष्ट्राच्या शौर्याला मानवंदना! सांताक्रूझच्या स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा उपक्रम गणेशभक्ती आणि शिवरायांच्या इतिहासाचा अनोखा संगम ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button