हिवरखेड नगरपरिषदेत भाजप-शिंदे गट आमनेसामने; राड्यानंतर संपूर्ण नगरपरिषद इमारत सील

सभागृहातील वाद थेट हाणामारीपर्यंत; दोन्ही बाजूंच्या तक्रारींवर परस्परविरोधी गुन्हे, CCTV फुटेज ठरणार महत्त्वाचा पुरावा
अकोला : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. २७ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान सुरू झालेला वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि दोन्ही गटांचे नगरसेवक एकमेकांसमोर भिडल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेसोबत विषयांची सविस्तर माहिती देणारी टिप्पणी न दिल्याच्या मुद्द्यावरून या वादाची ठिणगी पडल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला सभागृहात झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर नंतर जोरदार राड्यात झाले.
सभागृहात सुरू झालेला हा वाद नगरपरिषद इमारतीबाहेरही पोहोचला. यावेळी हाणामारी झाल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे. शिवसेनेकडून नगरसेवक आणि गटनेते रवी गुंगड तसेच नगरसेवक ऋषी पंचबुद्धे यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही मारहाण नगराध्यक्षांच्या नातेवाईकांकडून झाल्याचा आरोप शिवसेनेच्या गटाकडून करण्यात आला आहे.
दुसरीकडे, भाजपकडूनही शिवसेनेच्या नगरसेवकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत.
या घटनेनंतर दोन्ही गटांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करत तपास सुरू केला आहे. नेमकी हाणामारी कशी आणि कोणाच्या बाजूने सुरू झाली, याचा उलगडा करण्यासाठी नगरपरिषद परिसरातील CCTV फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
दरम्यान, CCTV फुटेजमध्ये कोणताही फेरफार होऊ नये आणि तपासासाठी आवश्यक पुरावे सुरक्षित राहावेत, यासाठी प्रशासनाने संपूर्ण हिवरखेड नगरपरिषद इमारतच सील केली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नगरपरिषद परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुतीत एकत्र सत्तेत असतानाही स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये झालेला हा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक राजकारणातील अंतर्गत मतभेद या राड्यामुळे चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू आहे.
आता CCTV फुटेजच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय होती आणि हाणामारीसाठी जबाबदार कोण, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे तसेच पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



