Mumbai

भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली

भिवंडीतील बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, एका बालकासह आणखी दोन ते तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत यापूर्वीच अतिधोकादायक घोषित करण्यात आली होती. पालिकेने रहिवाशांना नोटीसही बजावली होती. तळमजल्यावरील कमकुवत पिलरांची दुरुस्ती सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

सायंकाळी सहा वाजल्यापासून इमारतीला तडे जाऊ लागले होते. रात्री आठच्या सुमारास इमारत झुकू लागल्याने पालिका प्रशासनाने इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही रहिवासी आपले सामान काढण्यासाठी आत गेले होते आणि तळमजल्यावर दुरुस्तीचे कामही सुरू होते. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास संपूर्ण इमारत कोसळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिका आपत्कालीन पथक, एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. अरुंद रस्त्यामुळे बचावकार्यात सुरुवातीला अडथळे आले. त्यानंतर समोरील जुनी चाळ जेसीबीच्या मदतीने हटवून बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले.

सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button