citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित हल्ला; महिलेचा मृत्यू, घरमालक दाम्पत्य गंभीर जखमी

माजी भाडेकरूचा तलवार व चाकूने हल्ला; स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगर परिसरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या रक्तरंजित हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून घरमालक दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. माजी भाडेकरूने तलवार आणि चाकूच्या सहाय्याने हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अमर नगर येथे घडली. आरोपी रोशन नीलकंठ तरळ याने जुन्या वैमनस्यातून आपल्या माजी घरमालक धरमपाल सुदाम दाहत यांच्यावर तलवार व चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात धरमपाल दाहत आणि त्यांची पत्नी वनिता धरमपाल दाहत गंभीर जखमी झाले. तर घरात पाहुण्या म्हणून आलेल्या संगीता राजू चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन तरळ हा सुमारे वर्षभरापूर्वी काही महिन्यांसाठी धरमपाल दाहत यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. त्यानंतर तो राजीव नगर येथे राहायला गेला होता. भाडेकरू म्हणून राहत असताना झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून सूडभावनेतून त्याने हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हल्ल्यानंतर आरोपी घराबाहेर आला. मात्र परिसरातील काही तरुणांना पाहून त्याने त्यांनाही धमकावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपी पुन्हा घरात जाऊन दरवाजा आतून बंद करून बसला. प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांनी बाहेरून दरवाजा बंद करून आरोपीला घरातच कोंडून ठेवले आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेतले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

या घटनेमुळे अमर नगर परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली असून, लकडगंज पोलीस हल्ल्यामागील नेमके कारण, वापरलेली शस्त्रे आणि इतर सर्व बाबींचा सखोल तपास करीत आहेत. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button