अमरावतीत घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा; घरातील कर्मचाऱ्यालाच अटक, ₹7.02 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

मालकाच्या घराची रेकी करून केला हातसाफ; नागपुरी गेट पोलिसांची धडक कारवाई
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील इतवारा परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी घरात विश्वासाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील ₹7 लाख 2 हजार 944 किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमराज परसराम साहू (वय 58) हे इतवारा बाजार परिसरात स्वीट मार्ट हॉटेल चालवतात. त्यांच्या पत्नी अमरनाथ यात्रेसाठी गेल्या होत्या, तर मुलगा पुण्यात असल्याने घरात ते आणि त्यांची आई असे दोघेच राहत होते. 25 जुलै रोजी घराला कडी-कोंडा लावून ते हॉटेलवर गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यानंतर घरातील कपाटातून 15.900 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 26.340 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि ₹4 हजारांची रोकड असा एकूण ₹7 लाख 6 हजार 944 किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे फिर्यादीच्या दुकानात काम करणारा नदीम खान भुरे खान पठाण (वय 25), रा. इतवारा बाजार, अमरावती याला लोहा बाजार परिसरातून ताब्यात घेतले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत मालकाच्या घराची आधी रेकी करून संधी साधत चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील सोन्याची चेनही जप्त केली.
या कारवाईत चोरीस गेलेले ₹7 लाख 2 हजार 944 किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. चोरी झालेल्या रोकडपैकी रक्कम अद्याप हस्तगत झालेली नसून, त्याबाबतही तपास सुरू आहे. आरोपीला अटक करून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंखे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके तसेच नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
घरात विश्वासाने काम करणाऱ्या व्यक्तीनेच मालकाच्या घराची रेकी करून चोरी केल्याची बाब समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, घरगुती कर्मचारी ठेवताना आवश्यक पडताळणी करण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.



