citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticspoliticsWashim

विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ वाशिममध्ये काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

वाशिम | प्रतिनिधी

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ वाशिम शहरात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईच्या निषेधार्थ तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांना ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही निषेध यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

वाशिम शहरातील पाटणी चौकात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको केला, त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. आंदोलन शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेत संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुढे केंद्र सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button