अमरावतीत दुसरी जिल्हास्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात संपन्न

सब-ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर गटातील खेळाडूंची दमदार कामगिरी; विजेत्यांचा गौरव
अमरावती | प्रतिनिधी
बुडो मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ अमरावती डिस्ट्रिक्टच्या वतीने आयोजित दुसरी जिल्हास्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. रविवार, १९ जुलै रोजी सातुर्णा येथील गुरुकुल व्यायाम शाळा येथे आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
ही स्पर्धा बुडो मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष शिहान लहू पारवे आणि तांत्रिक अधिकारी शिहान संतोष कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अमरावती जिल्हा बुडो मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सेन्सेई उमेश मोवळे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली.
स्पर्धेत सब-ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर या विविध गटांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि क्रीडाभावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अमरावती जिल्हा बुडो मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सेन्सेई उमेश मोवळे, उपाध्यक्ष चेतन वाटनकर, सचिव विशाल चव्हाण, सहसचिव सागर मेश्राम, कोषाध्यक्ष आशिष वाघमारे, सदस्य जय कारंजकर, पिंकी प्रजापती, अभिषेक कडू, मुकेश भोयर तसेच प्रशिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
आयोजक, पदाधिकारी, प्रशिक्षक आणि स्वयंसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नातून स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या शेवटी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.



