citynewsLatest NewsMaharashtraRaigad

खोपोलीतील ऐतिहासिक शिवमंदिरातून 12 किलोचा चांदीचा मुकुट चोरीला

शिवलिंगावरील सुमारे 50 लाखांचा मुकुट लंपास; सीसीटीव्ही असूनही धाडसी चोरी, विशेष तपास पथक नियुक्त

रायगड | प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील पेशवेकालीन ऐतिहासिक शिवमंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत शिवलिंगावर स्थापित असलेला सुमारे 12 किलो वजनाचा चांदीचा मुकुट लंपास केला. अंदाजे 50 लाख रुपये किंमतीच्या या मुकुट चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील शिवलिंगावर प्रतिष्ठापित असलेला चांदीचा मुकुट नेहमीप्रमाणे रात्री मंदिरातच ठेवण्यात आला होता. मात्र, सकाळी मंदिर उघडल्यानंतर मुकुट जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने खोपोली पोलिसांना घटनेची माहिती दिली.

या चोरीनंतर मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली असून भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मंदिरातील सुरक्षेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असतानाही चोरट्यांनी ही चोरी कशी केली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात येत असून आरोपींचा माग काढण्यासाठी तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे.

या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असून परिसरातील संशयित हालचालींचीही चौकशी सुरू आहे.

चोरीमागील नेमका उद्देश काय, आरोपी कोण आहेत आणि चोरीस गेलेला चांदीचा मुकुट कुठे नेण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिस युद्धपातळीवर तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे केवळ भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसून राज्यातील ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून चोरीस गेलेला मौल्यवान मुकुट हस्तगत करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button