AmravaticitynewsLatest NewsMaharashtraSports

अमरावतीचा इंद्रांशसिंह बडगुजर सलग आठव्यांदा महाराष्ट्र स्टेट स्क्वॅश चॅम्पियन

पुण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक; अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राचा अभिमान

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीचा अव्वल स्क्वॅशपटू इंद्रांशसिंह राकेश बडगुजर याने पुण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य स्क्वॅश स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक जिंकत सलग आठव्यांदा महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनतर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत इंद्रांशसिंहने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १७ वर्षांखालील गट तसेच पुरुष गट या दोन्ही विभागांच्या अंतिम फेरीत विजय मिळवत दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले.

सन २०२० ते २०२६ या कालावधीत सलग आठ वेळा महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन बनण्याचा विक्रम करत इंद्रांशसिंहने राज्याच्या स्क्वॅश इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

इंद्रांशसिंह सध्या स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय क्रमवारीत देशात तिसऱ्या क्रमांकावर असून राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली आहे. तसेच स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सलग सहा वेळा महाराष्ट्र संघात निवड होण्याचाही मान त्याने मिळवला आहे.

बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. राकेश बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रांशसिंहने आपल्या कौशल्याला अधिक धार दिली. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे.

सलग आठव्यांदा महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन होण्याचा विक्रम करणारा इंद्रांशसिंह बडगुजर आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही उल्लेखनीय यश मिळवेल, असा विश्वास क्रीडावर्तुळातून व्यक्त केला जात आहे. त्याची ही सुवर्ण कामगिरी राज्यातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button