अकोल्यात गुटखा माफियांवर दुहेरी कारवाई; १.७४ कोटींचा मुद्देमाल जप्त

एफडीए आणि स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र छापे; चार जण ताब्यात, कथित सूत्रधार गौरव शर्मा फरार
अकोला | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि स्थानिक गुन्हे शाखेने एका दिवसात दोन स्वतंत्र धडक कारवाया करत तब्बल १ कोटी ७४ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा, कच्चा माल आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री जप्त केली आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, या अवैध व्यवसायाशी संबंधित कथित सूत्रधार गौरव शर्मा अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
पहिल्या कारवाईत अकोला एमआयडीसी फेज-४ परिसरातील महाकाया ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवर सुरू असलेल्या कथित अवैध गुटखा निर्मिती केंद्रावर एफडीएच्या पथकाने छापा टाकला. सहायक आयुक्त देवानंद वीर यांच्या नेतृत्वाखाली अकोला, अमरावती आणि वाशिम येथील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
छाप्यामध्ये ‘विमल’, ‘वाह’, ‘रेड लेबल’ आणि ‘बहार’ या नावांनी प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. कारखान्यातून सुमारे २,५०० किलो सुपारी, १,५०० किलो गुटखा प्रीमिक्स, ३८० किलो तंबाखू, ३०० किलो मॅग्नेशियम कार्बोनेट, कत्था पावडर, हजारो तयार गुटखा पाऊच, पॅकिंग रोल आणि रिकामे पाऊच जप्त करण्यात आले. तसेच चार पाऊच पॅकिंग मशीन, दोन ब्लेंडिंग मशीन, दोन ग्राइंडिंग मशीन, स्क्रीनिंग आणि सीलिंग मशीनसह अत्याधुनिक यंत्रसामग्रीही ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत १ कोटी २३ लाख १४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी फेज-२ परिसरातील एका गोदामावर स्वतंत्र छापा टाकून आणखी एका कथित अवैध गुटखा निर्मिती केंद्राचा पर्दाफाश केला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या छाप्यात अशोक केदारनाथ शर्मा आणि अजय लक्ष्मण जुंजाळकर यांना ताब्यात घेण्यात आले. गोदामातून सुपारी ग्राइंडर, केमिकल मिक्सर, पॅकिंग व सीलिंग मशीन, ड्रायर, एअर कॉम्प्रेसर, पाऊच प्रिंटिंग मशीन, कृत्रिम फ्लेवर, तंबाखू, सुपारी, कत्था तसेच मोठ्या प्रमाणात तयार गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईत ५० लाख ७२ हजार ५६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या दोन्ही कारवायांनंतर अकोल्यातून कार्यरत असलेल्या प्रतिबंधित गुटखा निर्मिती व वितरणाच्या मोठ्या जाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जप्त करण्यात आलेला माल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच इतर राज्यांमध्ये पुरविला जात होता का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील कथित सूत्रधार गौरव शर्मा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, आर्थिक व्यवहार कसे होत होते आणि वितरण साखळी किती मोठी होती, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.



