खुनाच्या प्रयत्नातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; फरार आरोपीला अमरावतीतून अटक
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पैशांच्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून आरोपी फरार झाला होता. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अमरावती शहरातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील जखमी दीपक टेकन यांना आरोपी पवन भाकरे आणि त्याच्या साथीदारांनी पैशांच्या कारणावरून प्रथम लुटल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करत दोघांमध्ये वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी दीपक टेकन यांच्यावर धारदार चाकूने पोट, पाठ आणि कमरेवर वार करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर मुख्य आरोपी पवन भाकरे घटनास्थळावरून फरार झाला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी अमरावती शहरातील चपराशीपुरा परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला लोणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अल्पावधीत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून, या गुन्ह्यातील इतर आरोपींचा सहभाग आणि घटनेचे नेमके कारण याबाबत लोणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.



