लूटमार आणि वाहन चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

ज्येष्ठ नागरिकाला धमकावून मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपीला सिताबर्डी पोलिसांची अटक
नागपूर प्रतिनिधी
नागपूर शहरातील लूटमार आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या एका सराईत आरोपीला सिताबर्डी पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. ज्येष्ठ नागरिकाला धमकावून मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत त्याला अटक केली. आरोपीकडून एकूण १ लाख ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी रात्री कृषी विद्यापीठ परिसरात ज्येष्ठ नागरिक भाऊलाल प्रितीलाल भगत यांना धमकावून त्यांचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून नेण्यात आली होती. या घटनेनंतर त्यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तसेच तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्यन भगवान नंदेश्वर या आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बर्गमन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे याच चोरीच्या दुचाकीचा वापर करून त्याने लुटमारीचा गुन्हा केल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी आरोपीकडून रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, चोरीची बर्गमन दुचाकी, रोख रक्कम तसेच विविध कंपन्यांचे चार मोबाईल फोन असा एकूण १ लाख ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनीता साहू, पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत उपनिरीक्षक विनोद तिवारी, शाम वारंगे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे लूटमार व वाहन चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासंदर्भात आणि इतर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



