Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बडनेऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई! ४० किलो गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत

गोवाणीपुरा-जुनी वस्ती परिसरात धाड; अमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीच्या बडनेरा परिसरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल ४० किलो गांजा जप्त केला आहे. गोवाणीपुरा आणि जुनी वस्ती परिसरात टाकलेल्या छाप्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक हसमंत उर्लोंडेवार यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकाला गोवाणीपुरा परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली.

माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी गोवाणीपुरा आणि जुनी वस्ती परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान तब्बल ४० किलो गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी बिस्मिल्ला बेग ऊर्फ गुड्डू यासीन बेग आणि जाकीर खान रहमत खान या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेला गांजाचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेला गांजा नेमका कुठून आणला गेला, त्याचा पुरवठा कोण करत होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच या नेटवर्कचे इतर जिल्ह्यांशी संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

या कारवाईनंतर अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. परिसरातील इतर अवैध धंद्यांवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बडनेरा पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. तपासादरम्यान आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून या प्रकरणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button