धनज बुद्रुक ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचा आरोप

ग्रामसेवकाविरोधात गावकऱ्यांची सामूहिक तक्रार; चौकशी, बदली आणि फौजदारी कारवाईची मागणी
कारंजा (वाशिम) प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आले असून ग्रामसेवक श्याम योगीराज वेलुकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीत ग्रामसेवकाची तात्काळ बदली, सखोल चौकशी आणि दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावकऱ्यांनी सामूहिक स्वाक्षरीनिशी सादर केलेल्या तक्रार अर्जानुसार, ग्रामसेवक श्याम वेलुकर हे नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरत असून ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात नागरिकांना सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार ग्रामसेवक गावात नियमित उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. याशिवाय विविध शासकीय योजनांच्या आढावा बैठका घेतल्या जात नसल्याने लाभार्थ्यांना योजनांची माहिती आणि लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तक्रार अर्जात काही गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेचे आरोपही करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता एका बडतर्फ लिपिकाची रोजंदारीवर नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित लिपिकाकडून मालमत्ता कराच्या पावत्यांवर स्वाक्षऱ्या व अधिकृत शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय पिंप्री मोडक ग्रामपंचायतीच्या लेटरहेडचा कथित गैरवापर करून शासकीय निधी संदर्भात अनियमितता आणि फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लिपिक आणि शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करून कोणतीही परीक्षा अथवा निवड प्रक्रिया न राबविता केवळ लेटरहेडवरील ठरावाच्या आधारे भरती प्रक्रिया करण्यात आल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे.
तक्रारीनुसार संबंधित लिपिकाविरोधात यापूर्वी बडतर्फीचा आदेश असतानाही त्याला पुन्हा कामावर ठेवण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकता आणि प्रशासनिक शिस्त यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक व प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामसेवकाची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
धनज बुद्रुक ग्रामपंचायतीतील या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली असून आता जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या तक्रारीची कितपत दखल घेतात व चौकशीचे कोणते आदेश देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



