citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeNagpurCrime

देवस्थानही सुरक्षित नाही! नागपुरातील हनुमान मंदिरात भरदिवसा चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद

नागपूर शहरात चोरट्यांची मजल आता देवस्थानांपर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठा इंदोरा परिसरातील हनुमान मंदिरात भरदिवसा चोरीची घटना घडली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करत गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोठा इंदोरा भागातील हनुमान मंदिरात सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. मंदिरातील देवाचे मौल्यवान भांडे तसेच इतर महत्त्वाचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने तातडीने जरीपटका पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान संशयिताची हालचाल फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाल्याचे आढळून आले. याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत प्रज्वल मेश्राम याला अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन वयापासूनच तो गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सक्रिय असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. सध्या पोलिस आरोपीची सखोल चौकशी करत असून चोरीस गेलेल्या साहित्याचा शोध तसेच त्याच्या इतर गुन्हेगारी कृत्यांबाबतही तपास सुरू आहे.

या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र जरीपटका पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने जलदगतीने कारवाई करत आरोपीला जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता चोरीस गेलेले सर्व साहित्य हस्तगत होते का आणि या प्रकरणातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button