AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत पुन्हा चाकूहल्ला; किरकोळ वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहर पुन्हा एकदा चाकूहल्ल्याच्या घटनेने हादरले आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिलम छावणी परिसरात किरकोळ वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय काळे यांच्या घरी आलेले कार्तिक लोमटे आणि लकी चव्हाण हे चिलम छावणी परिसरात उभे असताना काही तरुणांशी त्यांचा वाद झाला. वादानंतर संबंधित तरुणांनी दोघांनाही धमकी देत “तुम्हाला सोडणार नाही” असे सांगितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

यानंतर काही वेळातच आरोपी पुन्हा घटनास्थळी परतले आणि त्यांनी कार्तिक लोमटे व लकी चव्हाण यांच्यावर धारदार चाकूने हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले.

घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीचे वाद किंवा अन्य कोणता वाद होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे चिलम छावणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील वाढत्या हिंसक घटनांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

गाडगेनगर पोलिसांचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button