नागपुरात APK फाईलच्या माध्यमातून सायबर फसवणूक; महिलेच्या खात्यातून ३.८७ लाख रुपये लंपास

RBI, वाहन चलन आणि वीजबिलाच्या नावाने बनावट फाईल पाठवून गंडा; अनोळखी लिंक व APK फाईलपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
नागपूर : मोबाईलवर आलेली अनोळखी APK फाईल उघडणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांनी या फाईलचा वापर करून महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ८७ हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल झाली असून, नागरिकांनी अशा बनावट फाईल्सपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांच्या मोबाईलवर RBI, वाहन चलन किंवा वीजबिलाच्या नावाने APK फाईल पाठविल्या जात आहेत. संबंधित व्यक्तीने या फाईलवर क्लिक करून ती इन्स्टॉल केल्यास मोबाईलमधील वैयक्तिक माहिती आणि इतर संवेदनशील तपशीलांचा गैरवापर होण्याचा धोका असतो. याच माध्यमातून बँक खात्यांमधील व्यवहारांवर नियंत्रण मिळवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागपुरातील एका महिलेच्या बँक खात्यातून अशाच प्रकारे ३ लाख ८७ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या घटनेमुळे मोबाईलवरील अनोळखी फाईल्स आणि संदेशांबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची गरज अधोरेखित झाली आहे.
पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी APK फाईलवर क्लिक करू नये किंवा ती इन्स्टॉल करू नये, असा इशारा दिला आहे. तसेच बँक खाते, एटीएम किंवा ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित OTP कोणालाही सांगू नये. सरकारी यंत्रणा, बँका किंवा वीज वितरण कंपन्या अशा प्रकारे APK फाईल पाठवत नाहीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
विशेषतः सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी आणि आर्थिक व्यवहार वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. संशयास्पद संदेश, लिंक किंवा फाईल आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित संस्थेच्या अधिकृत माध्यमातूनच माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



