citynewsFarmersCrisisMaharashtra

एकाही शेतकऱ्याचे कर्जमाफी यादीतून नाव सुटणार नाही; केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजना राबवणार – चंद्रशेखर बावनकुळे

प्रत्येक जिल्ह्यात १० ते १५ हजार शेतकरी कुटुंबांचे केवायसी अपूर्ण; फायनान्स कंपन्यांना सक्तीची वसुली न करण्याच्या सूचना

अमरावती : राज्यातील कर्जमाफी योजनेपासून एकाही पात्र शेतकऱ्याला वंचित ठेवले जाणार नाही. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून याद्या तयार केल्या जात असून, शासन कर्जमाफीच्या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी करणार आहे, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अमरावती येथे विविध विषयांवर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात सुमारे १० ते १५ हजार शेतकरी कुटुंबांचे केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी मृत आई-वडिलांच्या नावावर बँक खाते असल्याने ते मुलांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी काही वेळ लागत आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकऱ्याचे नाव कर्जमाफीच्या यादीतून सुटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अमित शाह भेटीवर सावध प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता, उच्चस्तरीय बैठक झाली असेल. त्या बैठकीत काय निर्णय झाला, याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

बिश्नोई गँगच्या धमकीप्रकरणी पोलिसांकडून चौकशी

नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीपत्रे पाठविण्यात आल्याच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की, या धमकीप्रकरणी पोलीस चौकशी करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, शासनाकडून आवश्यक कारवाई केली जात आहे.

तुकाराम मुंडे यांच्या कारवाईत कोणताही हस्तक्षेप नाही

रांजणगाव येथील कंपनीवरील कारवाईला स्थगिती मिळाल्याच्या मुद्द्यावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. कोणत्याही दबावाखाली कारवाईला स्थगिती दिली जात नाही. काही वेळा कारवाईदरम्यान तांत्रिक बाबी अपूर्ण राहिल्याने स्थगिती मिळू शकते. तुकाराम मुंडे यांच्या तपासणीत काही बाबी समोर आल्या असतील किंवा काही प्रक्रिया अपूर्ण राहिल्या असतील, त्यामुळे कारवाई थांबविण्यात आली असावी. त्यांच्या कारवाईत कोणीही हस्तक्षेप करीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करू नका

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांवर वसुलीसाठी तगादा लावू नका. तुमचे पैसे नंतर मिळतील; मात्र शेतकऱ्यांना मानसिक त्रास होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येईल, असे काही करू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही कोणी सक्तीची वसुली करीत असल्याचे आढळल्यास शासन म्हणून कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका

जिल्हा परिषद निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. २७ टक्के ओबीसी आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात गेले, असा आरोप त्यांनी केला. हे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचेही ते म्हणाले.

२७ टक्के आरक्षणाबाबतचा निर्णय होण्याची प्रक्रिया सुरू राहील; मात्र ५० टक्क्यांच्या आरक्षणाच्या मर्यादेत निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार सरकार निवडणुकांसाठी तयारी करीत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button