लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आठ सराफा व्यापाऱ्यांना धमकीपत्र; प्रत्येकी १० लाखांची खंडणी मागितली

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; नागपूर सराफा असोसिएशनची पोलिसांसोबत बैठक, सुरक्षेचा आढावा
नागपूर : कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने नागपुरातील आठ सराफा व्यापाऱ्यांना धमकीची पत्रे पाठवून प्रत्येकी १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांसह शहरातील व्यापारी वर्गात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर सराफा असोसिएशनच्या वतीने व्यापारी आणि पोलिसांची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीला तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे आणि पोलीस उपायुक्त राहुल मदने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि सुरक्षेसंदर्भातील चिंता जाणून घेतल्या. अशा धमक्यांना घाबरून न जाता कोणतीही संशयास्पद बाब किंवा धमकी मिळाल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, तसेच तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आलेल्या धमकीपत्रांमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या धमक्या येऊ नयेत आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागपूर सराफा असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन धमकीपत्रांमागील व्यक्तींचा शोध घ्यावा आणि व्यापाऱ्यांना आवश्यक पोलीस संरक्षण व सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही व्यापारी संघटनांकडून व्यक्त होत आहे.
बाइट : राहुल मदने, पोलीस उपायुक्त, नागपूर



