नागपुरात अवैध तंबाखू माफियांवर प्रशासनाचा मोठा प्रहार; 419 किलो प्रतिबंधित साठा जप्त, आरोपी अटकेत

नागपूर | प्रतिनिधी
नागपुरातील पाचपावली परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अवैध तंबाखू विक्रेत्यांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) आणि पाचपावली पोलिसांच्या संयुक्त धाडीत तब्बल 419 किलो 766 ग्रॅम प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत सुमारे 5 लाख 99 हजार 272 रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही कारवाई पाचपावलीतील आझाद बुनकर कॉलनी परिसरात करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी अझर इकबाल कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. ए. एन. खंदारे यांच्या तक्रारीवरून संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अझर इकबाल कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अवैध तंबाखू व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध तंबाखू विक्रीची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपुरात अवैध तंबाखू आणि पानमसाला विक्रेत्यांवर प्रशासनाचा चाप दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसत असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



