अमरावतीत खळबळजनक घटना; तपोवन परिसरातील जंगलात तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, हत्येचा संशय गडद

अमरावती, प्रतिनिधी : अमरावती शहर हादरवून टाकणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तपोवन परिसराच्या मागील जंगलात एका अंदाजे 20 ते 22 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ लोखंडी रॉड आढळल्याने हा प्रकार हत्या असण्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपोवन परिसराच्या मागील जंगलात फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना हा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला.
पंचनामा करताना पोलिसांना मृतदेहाजवळ एक लोखंडी रॉड आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, त्या रॉडने डोक्यावर वार करून तरुणीची हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही घटना सुमारे तीन दिवसांपूर्वी घडली असावी. मात्र, मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त राकेश ओला, गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून सर्व शक्य बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे अमरावती शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या क्रूर प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, मृत तरुणी कोण आहे, तिची हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली, तसेच पुरावे नष्ट करण्यामागचा उद्देश काय होता, याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



