कांद्याचे घसरलेले दर आणि इंधन दरवाढीविरोधात सोलापुरात काँग्रेसचे आंदोलन; पोलिसांकडून नोटीस

कांद्याचे घसरलेले दर आणि इंधनाच्या वाढत्या किमतींविरोधात आज सोलापुरात काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख तिरुपती परकीपंडला यांना देण्यात आलेल्या नोटीसमध्ये आंदोलन कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी दोघेही अडचणीत आले आहेत. याच मुद्द्यांवर काँग्रेसकडून सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आंदोलनाची तयारी सुरू असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मार्केट यार्ड परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या आंदोलनाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले असून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



