मान्सूनपूर्व पावसाचा कहर! जळगाव जिल्ह्यात केळी, पपई, कांदा पिकांचे मोठे नुकसान

जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने आणि वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चोपडा, यावल आणि जळगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक भागांतील पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली.
चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा, वर्डी, खर्डी, लोणी पंचक या परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी बागा मोठ्या प्रमाणात आडव्या झाल्या. अनेक ठिकाणी पपईची झाडे उन्मळून पडली असून कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही ठिकाणी शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था आणि तात्पुरती शेडही कोसळल्याचे चित्र दिसून आले.
यावल तालुक्यातील डांभुर्णी आणि आसपासच्या गावांमध्ये मुसळधार पावसामुळे तूर, मका आणि केळी पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने अनेक पिके खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर जळगाव तालुक्यातील विदगाव परिसरातही पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बाजारपेठेत विक्रीसाठी तयार असलेल्या बागाच जमिनीवर कोसळल्या आहेत. आधीच वाढते खत, बियाणे आणि औषधांच्या किमतींमुळे अडचणीत आलेल्या बळीराजावर आता नैसर्गिक संकटाचे दुहेरी सावट आले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे केली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आणखी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



