Latest NewsMaharashtra PoliticsWashim

वाशिमच्या राजकारणात मोठा भूकंप! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी समर्थकांसह भाजपमध्ये

वाशिम जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना आज समोर आली. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे तब्बल २९ वाहनांच्या ताफ्यासह मुंबई गाठत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या निर्णयामुळे वाशिमच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच सुरेश मापारी यांनी हा मोठा राजकीय निर्णय घेतला. त्यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर मापारी नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

काल रात्रीच मापारी हे २०० ते २५० पदाधिकारी, सरपंच, माजी सदस्य आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले होते. २९ गाड्यांचा मोठा ताफा आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाची राज्यभर चर्चा रंगली होती. आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी ठाकरे गटातील तब्बल ८ नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम समिती सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ग्रामीण भागात त्यांचे मजबूत कार्यकर्ते जाळे असून अनेक गावांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

या घडामोडींमुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वाशिममधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून भाजपचे ग्रामीण भागातील संघटनात्मक बळ आणखी मजबूत झाल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याने मापारी यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याआधी ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने वाशिमच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button