AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

“आपली बस” सेवा बंद होण्याच्या उंबरठ्यावर; हजारो प्रवाशांसमोर वाहतुकीचे संकट

शहरातील हजारो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली “आपली बस” सिटी बस सेवा आता पूर्णपणे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. तब्बल १२ हजारांहून अधिक प्रवासी दररोज या सेवावर अवलंबून असताना, कंत्राटदाराने मुदतवाढ स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठे संकट निर्माण झाले आहे. २० वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

२००६ साली तत्कालीन महापालिका आयुक्त कुंदन कौशिक यांच्या पुढाकारातून “आपली बस” सेवा सुरू करण्यात आली होती. सामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि कष्टकरी वर्गासाठी ही सेवा खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरली. खासगी कंत्राटावर आधारित ही बससेवा गेल्या दोन दशकांपासून शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा भाग बनली होती.

सध्या या सेवेत १२ बसेस सहा प्रमुख मार्गांवर धावत आहेत. बडनेरा ते नवसारी, गोडे कॉलेज, विद्यापीठ, बीझीलँड, म्हाडा कॉलनी आणि बस स्थानक या मार्गांवर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. अनेक विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी ही सेवा परवडणारी आणि विश्वासार्ह वाहतुकीचा पर्याय मानली जाते.

मात्र आता या सेवेसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. “साहू टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स” या कंत्राटदार कंपनीचा करार २५ मे २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. महापालिकेने मुदतवाढ देऊन सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र कंत्राटदार महेश साहू यांनी दरमहा सहा ते सात लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे सांगत पुढील सेवा चालविण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

या निर्णयामुळे तब्बल ७० कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे.

दुसरीकडे, दररोज या सेवाचा वापर करणाऱ्या १२ हजार प्रवाशांना आता पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार आहे. खासगी वाहतूक किंवा ऑटो रिक्षांवर अवलंबून राहिल्यास नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासनाने ऑक्टोबरपर्यंत सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत असली तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सोमवारनंतर शहर बससेवेची चाके थांबण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.

“आपली बस” सेवा ही केवळ वाहतुकीचे साधन नसून शहरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. ही सेवा बंद झाल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. आता महापालिका आणि कंत्राटदार यांच्यातील चर्चा यशस्वी ठरते का, की खरंच “आपली बस” थांबते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button