यवतमाळमध्ये बजरंग दल कार्यकर्त्याची हत्या; गोवंश तस्करी रोखताना हल्लेखोरांचा निर्घृण हल्ला

यवतमाळ जिल्ह्यात गोवंश तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. गजानन मारोती सुरोशे, रा. वडद, ता. महागाव असे मृत बजरंग दल कार्यकर्त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून बोलेरो पिकअप वाहनातून १८ ते २० गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर बिजोरा टोल नाक्यावर संबंधित वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र तस्करांनी वाहन भरधाव वेगात पळवले. यानंतर गजानन सुरोशे यांनी आपल्या एस-क्रॉस कारमधून वाहनाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, सुकळी गावाजवळ आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी वाहनाची तोडफोड करत गजानन सुरोशे यांना बाहेर ओढले आणि बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. सुकळी आणि महागाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच या प्रकरणात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महागाव बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत गजानन सुरोशे यांना श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर–तुळजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यवतमाळमधील या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता आरोपींवर नेमकी कोणती कारवाई होते आणि या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



