AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बडनेरा जुनी वस्ती रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; नागरिकांनीच सुरू केली वाहतूक

अमरावती : तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे कोणतेही अधिकृत उद्घाटन न होता नागरिकांनी स्वतःहून पुलावरून वाहनांची ये-जा सुरू केली. त्यामुळे या घटनेची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.

जुनी वस्ती परिसराला अमरावती शहराशी जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. तांत्रिक अडचणी, निधीची कमतरता आणि प्रशासकीय विलंबामुळे प्रकल्पाचे काम सात वर्षे पूर्ण होऊ शकले नव्हते.

दरम्यान, पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाल्यानंतर केवळ काही किरकोळ कामे सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत पुल वाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुलावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या पुलामुळे बडनेरा आणि अमरावतीदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुल खुला झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

“आता आम्हाला उद्घाटनाची नाही, सुविधेची गरज आहे,” अशी भावना अनेक वाहनचालकांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर शहरात विविध चर्चा रंगू लागल्या असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने वेळेत प्रकल्प पूर्ण केले असते तर नागरिकांना इतकी प्रतीक्षा करावी लागली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button