पुरस्कारासाठी पात्र असूनही अशोक नगर ग्रामपंचायतीला डावलल्याचा आरोप; समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोक नगर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार प्रक्रियेत गंभीर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. शासनाच्या पोर्टलवर चुकीची माहिती अपलोड करून ग्रामपंचायतीला जाणीवपूर्वक कमी गुण देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणामुळे पंचायत राज अभियानाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अशोक नगर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासक सरपंच स्नेहल मनोज कडू यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
ऑनलाइन 18 गुण, ऑफलाइन 69 गुणांचा दावा
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामपंचायत पुरस्कारासाठी पात्र असतानाही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक माहिती योग्य प्रकारे अपलोड करण्यात आली नाही. परिणामी ऑनलाइन मूल्यमापनात ग्रामपंचायतीला केवळ 18 गुण मिळाले.
मात्र प्रत्यक्ष ऑफलाइन मूल्यमापनात अशोक नगर ग्रामपंचायतीला 69 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे चुकीची माहिती जाणीवपूर्वक भरून ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विकासकामांची यादीही सादर
ग्रामपंचायत प्रशासन, सदस्य आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून 16 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत विविध विकासात्मक, सामाजिक आणि स्वच्छता उपक्रम राबविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरव
अशोक नगर ग्रामपंचायतीला यापूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार आणि पर्यावरण ग्रामसमृद्धी पुरस्कार प्राप्त झाले असल्याची माहितीही देण्यात आली.
दोषींवर कारवाईची मागणी
ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती अपलोड करून ग्रामपंचायतीचे नुकसान केल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रताप अडसड यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
अशोक नगर ग्रामपंचायतीच्या या गंभीर आरोपांमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता प्रशासन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



