citynewsJalnaLatest NewsMaharashtra

बूट लपवण्याच्या रिवाजातून लग्नात तुफान राडा; महिलांसह अनेकांना मारहाण, दागिने हिसकावल्याचा आरोप

लग्नसमारंभ म्हटलं की आनंद, जल्लोष आणि पारंपरिक रितीरिवाज… पण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एका लग्नात बूट लपवण्याच्या रिवाजातून सुरू झालेला वाद थेट तुफान हाणामारीपर्यंत पोहोचला. महिलांसह अनेकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची गंभीर तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील नांदी गावात हा प्रकार घडला. लग्न विधी पार पडल्यानंतर नवरीकडील मंडळींनी पारंपरिक प्रथेप्रमाणे नवरदेवाचे बूट लपवले. सुरुवातीला हा प्रकार हसत-खेळत सुरू होता. मात्र काही वेळातच नवरदेवाचा भाऊ सोमनाथ गायकवाड याने प्रत्युत्तरादाखल नवरीची चप्पल लपविल्याने वातावरण तापले.

दोन्ही बाजूंमध्ये सुरू झालेला शाब्दिक वाद काही क्षणांतच हातघाईवर आला. लग्नाच्या मंडपातच महिलांसह अनेकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेत अश्विनी वानी, संगीता वानी, गणेश वानी, विशाल माळी, सोमनाथ गायकवाड आणि अलका गायकवाड हे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, काही महिलांच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी राधा गायकवाड, यशोदा गिऱ्हे, शोभा गिऱ्हे, दिनेश गोऱ्हे, लहू गिऱ्हे, शोभा गायकवाड तसेच नवरीच्या चुलतीसह काही अनोळखी महिलांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आनंदाचे वातावरण काही क्षणांत रणांगणात कसे बदलले याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नेमका वाद कशामुळे वाढला आणि दागिने हिसकावल्याच्या आरोपात कितपत तथ्य आहे, याचा शोध घेतला जात आहे.

लग्नातील छोट्याशा रिवाजातून सुरू झालेला वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने अंबड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button